देहूगाव-(रामकुमार आगरवाल)
चला पंढरीसी जाऊ।
रखुमादेवीवरा पाहूं।।
तुकाराम… तुकाराम… तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम… तुकाराम… तुकारामच्या जयघोषामध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने सोमवारी (दि. 20) वीणा, टाळ-मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषाने भक्तिमय वातावरणात पंढरीकडे प्रस्थान ठेवले. तीर्थक्षेत्र देहूतील मुख्य मंदिराच्या भजनी मंडपामध्ये दुपारी सव्वादोनच्या सुमारास हजारो भाविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा पार पडला.
आम्ही ज्याचे दास।
त्याचा पंढरीये वास।।
प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटेपासूनच वारकऱ्यांची लगबग सुरू होती. पहाटे इंद्रायणी नदी घाटावर स्नान, विधीसाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच मुख्य मंदिरात दर्शनार्थ भाविकांच्या लांबपर्यंत रांगा लावल्या होत्या. पहाटे 5 वाजता श्रीं ची संत तुकाराम महाराज शिळा मंदिर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी सहा वाजता वैकुंठस्थान मंदिरात श्री संत तुकाराम महाराज महापूजा पार पडली. त्यानंतर सकाळी सात वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे माजी अध्यक्ष, विश्वस्त, महाराजांचे वंशज आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची रामदास महाराज देहूकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
मान्यवरांच्या हस्ते पादुका पूजन
दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रमाला प्रारंभ झाला. नांदेडकर दिंडीची ज्येष्ठ वारकरी गोविंद गवलवाड, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, त्यांची पत्नी सारिका शेळके, आमदार रोहित पवार, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते जगद्गुरूंच्या पादुकाचे महापूजन ग्रामोपाध्याय पंडित प्रसाद जोशी यांनी वेद मंत्रपठण, वरुण, कलश पूजनाने केली.
गाये नाचे उडे आपुलिया छंदे…
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील विविध प्रांतामधून वारकरी दाखल झाले आहेत. वैष्णवांच्या महासागराने इंद्रायणीचा काठ फुलून निघाला होता. प्रत्येक वारकऱ्याच्या मुखामध्ये तुकाराम तुकाराम हा नामघोष सुरू होता. पालखी प्रदक्षिणादरम्यान वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह होता.
संत तुकाराम महाराजांच्या अभंग उक्तीप्रमाणे यारे यारे लहान थोर। याति भलती नारी नर।। सर्व लहान थोरांनी सर्व जातीधर्माच्या वैष्णावांनी भेदाभेद न मानता टाळ, मृदंग आणि नामघोषावर पाऊली घालत तुकाराम तुकारामच्या नामघोषात तल्लीीन झाले होते. नव्हे नव्हे संत उक्तीप्रमाणे गाये नाचे उडे आपुलिया छंदे। मनाच्या आनंदे आवडीने।। या पालखी सोहळ्यात वारकरी सहभागी झाले होते.