हैद्राबाद – कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश हिने नुकतीच रूट कॅनाल सर्जरी केली, ज्यासाठी तिला मोठा खर्च आला. मात्र चुकीच्या उपचारांमुळे स्वाती सतीश हिचा चेहरा खराब झाला. चुकलेल्या शस्त्रक्रियेनंतर स्वातीचे काही फोटोही समोर आले आहेत. स्वातीने तिच्या प्रकृतीसाठी डॉक्टरांना जबाबदार धरले असून त्यांच्यावर चुकीचे उपचार केल्याचा आरोपही केला आहे.
रिपोर्ट्सनुसार, बेंगळुरू येथील रहिवासी असलेल्या स्वाती सतीशवर नुकतीच रूट कॅनल सर्जरी करण्यात आली आहे. यानंतर तिचा संपूर्ण चेहरा सुजला आणि वेदना सुरू झाल्या. डॉक्टरांनी स्वातीला आश्वासन दिले होती की 2-3 दिवसात तिचा चेहरा ठीक होईल आणि सूज देखील कमी होईल. पण, 3 आठवड्यांनंतरही तिची अवस्था तशीच होती. आता तिचे संपूर्ण रूपच बिघडले असून स्वातीला ओळखणे कठीण झाले आहे. यामुळे स्वातीने आता घराबाहेर पडणे बंद केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वातीने डॉक्टरवर तिला उपचार आणि औषधांबाबत चुकीची आणि अर्धवट माहिती दिल्याचा आरोप केला आहे. उपचारादरम्यान स्वातीला भूल देण्याऐवजी सॅलिसिलिक अॅसिड देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात गेल्यावर स्वातीला हा प्रकार समजला. आता स्वाती सतीश घरी आहे.
सॅलिसिलिक ऍसिड हा असा एक रासायनिक पदार्थ आहे, जो विशेषत: बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक त्वचेच्या काळजी उत्पादनांमध्ये वापला जातो. हे सहसा शरीराच्या बाह्य भागावर वापरले जाते. मुरुम किंवा त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळविण्यासाठी हे उपयुक्त आहे. सॅलिसिलिक ऍसिडचा चुकीचा वापर केल्यास रुग्णाच्या मूत्रपिंड, यकृत आणि हृदयावर वाईट परिणाम होतो. हे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे लागते.