पाटणा – अग्निपथ योजनेच्या विरोधातील आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण लागले असून आंदोलकांनी बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी आणि बिहार भाजप अध्यक्षांच्या घरांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. बेतिया येथील भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार संजय जैस्वाल यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी हल्ला केला. त्यात किमान एक पोलीस जखमी झाला.
जैस्वाल यांनी एएनआयला सांगितले की, ही घटना घडली तेव्हा ते त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी होते. मालमत्तेचे फारसे नुकसान झालेले नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या मुलाने एएनआयला सांगितले की, “आमच्या बेतिया येथील निवासस्थानावर हल्ला झाला. त्यात आमचे खूप नुकसान झाले. हा प्रकार घडला तेव्हा रेणू देवी पाटण्यात होत्या. आज बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि तेलंगणा सारख्या अनेक राज्यांमध्ये उग्र आंदोलनांमुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली.
अनेक ठिकाणी रेल्वेचे डबे जाळण्यात आले. तेलंगणामध्ये, अग्निपथ योजनेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ झाल्यामुळे तेलंगणा पोलिसांनी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर जमावावर गोळीबार केला. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत.