पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी सदनिकांचे कुलुप तोडून रोकड तसेच दागिने चोरून नेल्याच्या घटना घडल्या. दत्तवाडी, सिंहगड, वडगाव बुद्रुक आणि हडपसर भागात एकूण 5 घरफोडीच्या झाल्या.
दत्तवाडी भागातील लक्ष्मीनगर सोसायटीतील रहिवासी महादेव वसंत भोसले यांच्या सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड, दागिने असा एक लाखांचा ऐवज चोरला. हिंगणे खुर्द परिसरात सुनील गवळी यांच्या घरातून चोरट्यांनी रोकड आणि पैंजण चोरून नेले. तर वडगाव बुद्रुक जाधवनगर येथे पांडुरंग भालेकर यांच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला.
तसेच जाधवशेजारी अनंत वणगे यांच्या घरातील ऐवजही चोरला. हडपसर भागातील त्रिमूर्ती सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोकड असा 45 हजारांचा ऐवज लांबविला.