मुंबई : ईडीचा ताबा ४८ तासांसाठी आमच्या हातात दिला तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल केली होती. दरम्यान, संजय राऊतांच्या या टीकेला आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी चोख उत्तर दिले आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव असणाऱ्या निलेश राणे यांनी ट्विटरवरुन भाष्य करत राऊत यांच्या या वक्तव्याला ‘भीक मागणे’ असे म्हटले आहे.
निलेश राणेंनी ट्विटरवरुन ईडीचा ताबा जणू काही दोन हजार रुपये उधार मागितल्याप्रमाणे मागितला जातोय असे म्हटले आहे. “संजय राऊत दोन दिवसांसाठी ईडी मागतायत, जसं काही दोन हजार उधार मागतायत. अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे. हे सगळं कमवावं लागतं,” असे ट्विट निलेश राणेंनी संजय राऊत यांनी ईडीसंदर्भातील विधान केल्याच्या काही तासांनंतर केले.
राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे.
सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. पुरेसे संख्याबळ असूनही पवार यांचा पराभव झाल्यामुळे भाजपाला अपक्षांची मते फोडण्यात यश आले असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.