बंगळुरू – कर्नाटकमधील सत्तारूढ भाजपने राज्यसभेच्या 4 पैकी 3 जागा खिशात घातल्या. तर, चौथी जागा कॉंग्रेसच्या हाती आली. मात्र, जेडीएसच्या पदरी साफ निराशा आली.
कर्नाटकमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 4 जागांसाठी 6 उमेदवार रिंगणात होते. भाजपने 3 तर कॉंग्रेसने 2 उमेदवार दिले. जेडीएसने 1 उमेदवार रिंगणात उतरवला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अभिनेते जग्गेश आणि आमदार लहरसिंह सिरोया या भाजपच्या तिन्ही उमेदवारांनी राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला.
कॉंग्रेसच्या उमेदवारांपैकी माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश विजयी झाले. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी किमान 45 मते आवश्यक होती. संख्याबळ विचारात घेता भाजपच्या 2 आणि कॉंग्रेसच्या एका उमेदवाराचा विजय निश्चित होता. त्यामुळे भाजपने 1 अतिरिक्त जागा जिंकण्यात यश मिळवले. पुरेसे संख्याबळ नसतानाही जेडीएसने एक आणि कॉंग्रेसने दुसरा उमेदवार दिला.