बारामती/जळोची – बारामती शहर पोलिसांनी शहरातील वसंतनगर टीसी कॉलेज रोड येथे तब्बल 11 लाख 8 हजार 800 रुपयांचा गुटखा व गुटखा वाहतूक करणारा टेम्पो (दोन लाख)जप्त केला. याबाबत पोलीस नाईक यशवंत ज्ञानदेव पवार यांच्या फिर्यादीवरून संतोष गायकवाड व एक अज्ञात इसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (दि. 9) पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे यांना गोपनीय बातमीदाराकडून शहरातील वसंतनगर ते टीसी कॉलेज रोड दरम्यान टेम्पोमधून (एमएच 12 क्यूजी 8872) गुटखा वाहतूक केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने इंगळे यांनी पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, सहायक निरीक्षक पालवे, वाघमारे, कॉन्सेटेबल चव्हाण, ठोंबरे, दळवी, कांबळे यांना सोबत घेतले. वसंतनगर येथून टी. सी. कॉलेजकडे जाणाऱ्या बाजूकडे साधारण 300 मिटर पायी चालत जात असताना मिशन हायस्कूल शेजारील रस्त्यावर टेम्पो थांबलेला दिसला.
पोलीस टेम्पो जवळ जाताच टेम्पोमधून संतोष गायकवाड व एक अनोळखी व्यक्ती तार कंपाऊंडवरुन उडी मारुन अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता पांढऱ्या पिशव्यांमध्ये गुलाम नावाचा 11 लाख 8 हजार 800 रुपयांचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी 2 लाख रुपयांचा टेम्पोसह तब्बल 13 लाख 8 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.