मंड्या – ऋषभ शेट्टीचा कांतारा (Kantara) हा कन्नड चित्रपट भाषेचा कोणताही अडथळा न येता देशभरात सध्या जोरात व्यवसाय करतो आहे. कोणताही मोठा कलाकार नसतानाही कांतारा सुपरहिट झाला असून नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे.
असे असतानाच हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाचा चित्रपटगृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंड्या जिल्ह्यात घडली आहे.
राजशेखर असे मरण पावलेल्या या 45 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. (45-Year-Old Man Dies of Heart Attack While Watching Kantara) नागमंगला येथील व्यंकटेश्वरा चित्रपटगृहात सोमवारी रात्री ही घटना घडली. राजशेखर त्याच्या मित्रांसोबत कांतारा पाहण्यासाठी गेला होता. चित्रपटाचा शेवट सुरू असताना त्याला छातीत दुखू लागले. त्याला बाहेर नेत असतानाच तो खाली कोसळला व त्याने अखेरचा श्वास घेतला.
राजशेखर हा कुनीकेनहल्ली या गावाचा रहिवासी असून एका खासगी महाविद्यालयात तो कामाला होता. तो चित्रपट पाहण्यासाठी गेला तेव्हा त्याची प्रकृती अगदी चांगली होती व त्याला काहीच त्रास होत नव्हता अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.