मुंबई – महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरूवारी जम्मूत एका संशयिताला अटक केली. पुण्यात काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या जुनैद मोहम्मद याच्याशी लागेबांधे असल्यावरून ती कारवाई करण्यात आली.
पुण्याच्या दापोडी भागात 24 मे यादिवशी जुनैदला पकडण्यात आले. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या संघटनेतील काही दहशतवाद्यांच्या संपर्कात होता.
तोयबामध्ये दहशतवाद्यांची भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. त्याच्या संपर्कात जम्मू-काश्मीरमधील एक जण असल्याचे एटीएसच्या तपासातून पुढे आले. त्यामुळे एटीएसचे एक पथक काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरला रवाना झाले. त्या पथकाने जम्मू विभागातील किश्तवाडमध्ये एकाला अटक केली. त्या संशयिताला आता मुंबईत आणले जाईल.