परभणी – राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC) 2020 चा अंतिम निकाल व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाने ट्वीट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० चा निकाल महिनाभर आधी जाहीर करण्यात आला होता. २९ एप्रिल रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेत परभणीच्या नम्रता विजयकुमार मुंदडा या विद्यार्थिनीने मुलींमध्ये सामान्य गुणवत्ता यादीत राज्यात 10 वा तर ईडब्ल्यूएस मध्ये राज्यात 4 था क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. तिची मंत्रालय मुंबई येथे कक्ष अधिकारी (सेक्शन ऑफिसर) पदी निवड झाली आहे.
या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार व आप्तेष्टांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
या यशाबद्दल विचारले असता मी सरकारी नोकरीत जावे ही माझ्या आईची इच्छा होती. आता आईचे स्वप्न पूर्ण केल्यामुळे मनस्वी आनंद होत असून या यशामुळे हुरळून न जाता पुढे उपजिल्हाधिकारी पदासाठी तयारी करणार असल्याचे नम्रता हिने दैनिक प्रभात शी बोलताना सांगितले.