पुणे – महापालिकेच्या 58 प्रभागातील 173 जागांसाठी मंगळवारी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षणासाठी सोडत होणार आहे. यामध्ये मागील कार्यकारिणीमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या 165 नगरसेवकांपैकी किती जणांना पुन्हा उमेदवारी मिळणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोण “इन’ कोण “आउट’ हे देखील
समजणार आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी अनुसूचित जातीच्या 23, जमातीच्या 2 आणि महिला आरक्षणाच्या एकूण 87 जागांसाठी गणेश कला क्रीडा मंच येथे सोडत होणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या 25 जागा आणि प्रभाग निश्चित झाले आहेत. तर एकमेव असलेल्या प्रभाग क्र. 14 सुस बाणेर या द्विसदस्यीय प्रभागातील एका जागेवरील महिला आरक्षण निश्चित आहे.
मागील निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली होती. त्यामुळे ओबीसी आरक्षणासह महिला आरक्षण असले तरी आपल्याला संधी मिळणार अशी सर्वच पक्षातील इच्छुकांना अपेक्षा होती. त्याप्रमाणे ती पूर्ण ही झाली. परंतु यंदा त्रिसदस्यीय रचना असल्याने एका नगरसेवक अथवा नगरसेविकेचा पत्ता कट होणार हे अगोदरच स्पष्ट झाले आहे. ओबीसी आरक्षणाचा फैसला न झाल्याने त्याशिवाय होणाऱ्या या स्पर्धेतून काही प्रभागात विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर उद्या आरक्षण सोडती निमित्ताने तिसऱ्या टप्प्यात काहीजणांना घरी बसावे लागणार आहे, यामुळेच आरक्षण सोडतीबाबत उत्सुकता वाढली आहे.
आरक्षणानंतर ‘पक्षांतर’
आरक्षण काय पडणार हे माहिती नसल्याने अनेकांनी आपापल्या पक्षामध्ये तग धरला आहे. आरक्षणानंतर मात्र खऱ्याअर्थाने तिकीट मिळवण्यासाठी मारामारीला सुरुवात होणार आहे. त्यातूनच “पक्षांतर’च्या घडामोडींना वेग येणार हे निश्चित आहे. काही ठिकाणी विद्यमानांना धक्का बसणार हे अध्यारूतच असल्याने त्यांचा काय फैसला असेल, हे देखील येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. पक्षनिष्ठा ठेवून पक्षाचे आदेश ऐकणार की, खुर्ची राखण्यासाठी पक्षांतर करणार हे देखील यानिमित्ताने काही समजणार आहे.