बेंगळुरू –कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या सातही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्या निवडणुकीमुळे संख्याबळ वाढल्याने सत्तारूढ भाजपने विधान परिषदेतही बहुमत मिळवले.
विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेलेल्या सात सदस्यांपैकी चौघे भाजपचे आहेत. कॉंग्रेसला दोन जागा मिळाल्या. तर, जेडीएसला एका जागेवर समाधान मानावे लागले. भाजपच्या दोन जागा वाढल्या, तर कॉंग्रेस आणि जेडीएसला प्रत्येकी एक जागा गमवावी लागली.
आताच्या निवडणुकीआधी 75 सदस्यीय विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ 37 इतके होते. तो पक्ष बहुमतापासून एक जागा दूर होता. आता दोन जागा अतिरिक्त मिळाल्याने भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला. त्यामुळे भाजपला निवडणूक राजकीयदृष्ट्या लाभदायी ठरली.