इस्लामाबाद – आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर तीस रुपयांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोल 179 रुपये 85 पैसे तर एक लिटर डिझेल 174 रुपये 15 पैसे या दराने मिळणार आहे. पाकिस्तानमध्ये एक लिटर केरोसिन 155 रुपये 95 पैसे या दराने उपलब्ध आहे.
पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढलेल्या किंमतींच्या मुद्यावरून माजी दरम्यान, या दरवाढीनंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरिफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करून दर नियंत्रणात ठेवणाऱ्या भारत सरकारचे त्यांनी पुन्हा एकदा जाहीर कौतुक केले.
आपल्या पक्षाचे सरकार असताना रशियासोबत करार झाला असता तर इंधन 30 टक्के स्वस्त होणार होते. पण शहबाज शरिफ यांच्या सरकारने आमच्या प्रयत्नांना सुरूंग लावला असा आरोप त्यांनी केला.
भारताने मात्र एकाचवेळी अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांसोबतच्या मैत्रीमध्ये संतुलन राखून जास्तीत जास्त वाजवी दरात इंधन आयात करण्याला प्राधान्य दिले. भारतात दर नियंत्रणात असल्याचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती सरसकट वाढविण्यात आल्या त्यामुळे सरकारला मोठ्या रोषाचा सामना करावा लागणार आहे.
पाकिस्तान सरकारने मात्र दरवाढीचे समर्थन केले आहे. दरवाढ केली तरी एक लिटर डिझेलमागे पैशांचा अतिरिक्त भार आजही सरकार सोसत आहे. दरवाढ केली नसती तर पाकिस्तान आर्थिक संकटात सापडण्याचा धोका होता, अशा स्वरुपाचा दावा पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माइल यांनी केला.
पाकिस्तानच्या रूपयात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे या देशाची श्रीलंकेसारखी अवस्था होण्याच्या मार्गावर असून त्यांना कर्ज देणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांनीही हात अखडता घेतला आहे. पाकिस्तानला जे 2 अब्ज डॉलर कर्ज स्वरूपात मिळणार होते, तेही रोखून धरण्यात आले असून त्यासाठी इंधन दरवाढीची प्रमुख अट ठेवण्यात आली होती. दरम्यान श्रीलंकाही आर्थिक संकटात असून येथे महागाई गगनाला भिडली आहे. आता पाकिस्तानही श्रीलंकेच्या वाटेवर असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.