चेन्नई – भारताचा युवा ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद याने चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनचा वेई इ याच्यावर 2.5-1.5 अशी मात केली व थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपउपांत्यपूर्व फेरीत त्याने आपलाच सहकारी ग्रॅंडमास्टर विदित गुजराथीचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.प्रज्ञानंदने सहाव्या फेरीत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करत सनसनाटी विजय प्राप्त केला होता. तीन महिन्यांपूर्वीही प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कार्लसनला पहिल्यांदा पराभूत केले होते. या स्पर्धेतही त्याने कार्लसनला धक्का दिला.
साखळी फेरीच्या अखेरीस प्रज्ञानंद (25 गुण) नेदरलॅंड्सचा अनिश गिरी (29 गुण), नॉर्वेचा कार्लसन (28 गुण) आणि चीनचा डिग लिरेन (25 गुण) यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर आला आहे. आतापर्यंत झालेल्या या स्पर्धेत 15 फेऱ्यांमध्ये प्रज्ञानंदने आठ विजय मिळवले असून, चार सामने गमावले आहेत. तीन सामन्यांत बरोबरी स्वीकारली.
त्याच्याव्यतरिक्त भारताच्या पी. हरिकृष्णलाही उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले. त्याला 18 गुणांसह नवव्या, तर विदितला 17 गुणांसह 11 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.