पॅरिस – लाल मातीच्या फ्रेंच ओपन ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही सनसनाटी निकाल नोंदले गेले. पहिल्या दिवशी डॉमिनिक थिमचा धक्कादायक पराभव झाला, तर सोमवारी दुसऱ्या दिवशी जपानची अग्रमानांकित महिला टेनिसपटू नाओमी ओसाका हिला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अन्य महिला एकेरीच्या लढतीत अव्वल खेळाडू इगा स्वेटेकने मात्र, धडाक्यात विजय मिळवत दुसरी फेरी गाठली.
पोलंडची स्टार खेळाडू स्वेटेकने पहिल्या फेरीत युक्रेनच्या लीसा सुरेंन्कोचा 6-2, 6-0 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला व दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिलांच्या एकेरीच्या अन्य महत्वाच्या लढतीत जपानच्या अव्वल मानांकित नाओमी ओसाकाला अमेरिकेच्या अमांडा ऍनिसिकोव्हाकडून 7-5, 6-4 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला.
चीनच्या क्विनान झेंगने युक्रेनच्या मर्यना झेनेवस्कावर 6-3, 6-1 असी मात केली. चेक प्रजासत्ताकची प्रख्यात महिला टेनिसपटू पेट्रा क्विटोव्हानेही पहिल्या फेरीत विजयी सलामी देताना हंगेरीच्या ऍना बोंडरचा 7-6, 6-1 असा पराभव केला.
पुरुषांच्या एकेरीत सर्बियाचा फिलीफ क्राजीनोव्हीकने अमेरिकेच्या रेली ओपेल्काचा 7-6, 6-2, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव केला. त्यापूर्वी ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमला पुरुष एकेरीतील पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला बोलिव्हियाच्या ह्युगो डेलिएनकडून 6-3, 6-2, 6-4 असा पराभव स्वीकारावा लागला. बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हने अमेरिकेच्या मार्कोस गिरोनला 6-1, 6-1, 6-1 असे पराभूत केले.