पॅरिस – लाल मातीच्या कोर्टवर शनिवारी (दि.4 मे) अमेरिकेची स्टार टेनिसपटू कोको गॉफ व पोलंडची अनुभवी खेळाडू ईरा स्वेटेक यांच्यात फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची महिला एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे.
गॉफने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसनचा 6-3, 6-1 असा पराभव केला. हा सामना एक तास 28 मिनिटे चालला. तब्बल 18 वर्षांच्या कालावधीनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी कोको सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी 2004 साली रशियाची मारिया शारापोव्हा अंतिम सामन्यात खेळणारी सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली होती.
गॉफ सध्या जागतिक क्रमवारीत 23 व्या स्थानावर आहे. तिने आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकही ग्रॅंडस्लॅम विजेतेपद जिंकलेले नाही. अशा स्थितीत आता ती जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या स्वेटेकशी लढत देणार आहे. स्वेटेकने दारिया कस्ताकिनावर 6-2, 6-1 असा विजय मिळवला.
स्वेटेकने 2020 सालानंतर पहिल्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आता या लढतीत स्वेटेकचा अनुभव यशस्वी ठरणार का गॉफची जिद्द हे पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. जर गॉफने विजेतेपद मिळवले तर शारापोव्हानंतर ग्रॅंडस्लॅम जिंकणारी दुसरी सर्वात तरुण खेळाडू ठरेल.