बिबवेवाडी (हर्षद कटारिया) – राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार दि. 19 मे ते 21 मे दरम्यान विजांच्या कडकडाटांसह पुणे शहर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातच शहर आणि उपनगरांत पावसाळापूर्व ओढे, नाले सफाईची कामे सुरू असून आयुक्त विक्रम कुमार यांच्या आदेशानुसार दि. 15 जून पर्यंत ही कामे पूर्ण करण्याची जबाबदारी पालिकेच्या तीन अतिरिक्त आयुक्तांवर विभागनिहाय देण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस आलाच तर पालिकेच्या नाले सफाई कामाच्या नियोजनावर पाणी फिरणार आहे.
नाले, ओढे, कल्व्हर्ट, पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेजलाइन स्वच्छतेची कामे क्षेत्रीय कार्यालयांद्वारे केली जात होती. परंतु, त्या-त्या भागात राजकीय दबाव, कामात हस्तक्षेप यातून ही कामे रेंगाळत होती. त्यामुळे ही कामे पालिका प्रशासनाने हाती घेतली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून ही कामे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुरू केली आहेत. परंतु, त्यानंतरही या कामांना वेग आलेला नाही. याबाबत नागरिकांनी माजी नगरसेवकांकडे तक्रारी केल्यानंतर काही भागांतून याबाबत आयुक्तांकडे तक्रारी गेल्या आहेत. याची दखल घेत प्रशासक विक्रम कुमार यांनी अतिरिक्त आयुक्तांना आदेश देत ही कामे दि. 15 जून पर्यंत पूर्ण करण्याची सूचना केली आहे. परंतु, हवामान विभागाच्या अंदाजानुसार दोन दिवसात पाऊस सुरू होत आहे.
कामे वेगाने होत असल्याच दावा…
महापालिकेच्याजुन्या आणि नव्या हद्दीतील नाले आणि उपनाल्यांची एकूण लांबी 647 किलोमीटर आहे. त्यावर एकूण 742 कल्व्हर्ट आणि 12 बंधारे आहेत. यापैकी 97 किलोमीटर लांबीचे नाले आणि 221 कल्व्हर्टची सफाई झाल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे.
पावसाळा पूर्वीची नाले सफाईची कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत पाऊस पडल्यास पावसाळी वाहिन्या तुंबून नागरिकांच्या घरात पाणी जाण्याचा धोका आहे. प्रशासनाच्या नियोजन शून्य कामाचा फटका पूर्ण शहराला असू शकतो. आता जे केले आहे त्या कामाचे सुद्धा पैसे पाण्यात जातील.
– संतोष नांगरे,
अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, पर्वती मतदार संघ
आंबील ओढ्यात नवीन ड्रेनेजलाइनचे काम सुरू आहे. सदर काम करताना मोठ्या प्रमाणात राडारोडा काढून तेथेच बाजूला ठेवण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना राडारोडा काढण्यास सांगितले. मात्र, दुर्लक्ष करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसांत जोरदार पाऊस पडल्यास राडारोडा पुन्हा ओढ्यात जाईल.
– अभिजित बारवकर, सामाजिक कार्यकर्ता