बिबवेवाडी (हर्षद कटारिया) – संकल्पना, सौजन्य या नावाने नगरसेवकांनी सुशोभिकरणावर केलेला खर्च त्यांच्याकडूनच वसूल करावा किंवा अशा कामांवरील त्यांची नावे काढावीत, नागरिकांचा कर आणि नावे यांची का? असा सवाल करीत “संकल्पना’ कामांना आम आदमी पक्षाने (आप) कडाडून विरोध दर्शविला आहे. या प्रकरणावर सर्वात प्रथम “प्रभात’ने दिले होते. याच पार्श्वभूमीवर “आप’ने हा मुद्दा उचलून धरत प्रशासक विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे, अतिक्रमणांवर धडक करवाई करणारे पालिका प्रशासन “संकल्पना’ नावे काढणार का? याकडे नागरिकांचे लक्ष असणार आहे. शहर तसेच उपनगरांत सर्वच नगरसेवकांनी आपल्या पदाच्या अखेरच्या टप्यात पालिकेकडून सुशोभिकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी घेत “संकल्पना’ या नावाने स्वत:ची प्रसिद्धी करून घेतली. ही कामे सुरू झाली त्याचवेळी याबाबत “प्रभात’ने अशी अनेक काम समोर आणली होती. अशा “संकल्पना’बाबत नागरिकांकडूनही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
कोट्यवधींच्या निधीची उधळपट्टी….
जनतेच्या करातून महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या निधीतून जाणाऱ्या सार्वजनिक सुविधा, सेवा, बांधकामे, रस्ते, उड्डाणपूल, बगीचे, उद्याने, शौचालये, स्मशानभूमी, समाजमंदिर, मंडई, अग्निशमन केंद्र अशा ठिकाणांसह खासगी संस्था, सोसायट्यांबाहेर नगरसेवकांच्या नावे सौजन्य किंवा संकल्पना फलक झळकत आहेत.