औंध – पुणे महानगरपालिकेची मागे झालेली प्रभाग रचना पुन्हा तशी जाहीर झाली. यावर काही जणांनी आक्षेप घेतले होते.सुरुवातीपासूनच सर्वात जास्त चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक 13 बाणेर, सूस, महाळुंगे या प्रभागासंदर्भात अनेकांनी आक्षेप घेतले होते. प्रभाग जाहीर होण्याआधीच या प्रभागाचा नकाशा देखील “लीक’ झाला होता. त्यावेळी बाणेर येथील नागरिकांनी त्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता, नुकत्याच जाहीर झालेल्या रचनेत प्रभाग क्रमांक 13 मध्ये किरकोळ बदल करून हा प्रभाग पूर्वी जसा होता तसाच ठेवण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 12 व प्रभाग क्रमांक 13 संदर्भात एकूण 47 हरकती दाखल झाल्या होत्या. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होऊनही प्रभाग क्रमांक 12 व 13 मध्ये किरकोळ बदल करण्यात आले व हे प्रभाग पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत.
या प्रभाग रचनेसंदर्भात बाणेर येथील प्रवीण शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याची सुनावणी आज होऊन यामध्ये प्रभाग क्रमांक 13च्या संदर्भात लेखी स्वरूपात आपले म्हणणे तत्काळ मांडण्याचे आदेश हायकोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.
बाणेर, बालेवाडी ही गावे आधीपासूनच एकत्र आहेत. या दोन्ही गावांचे डीपी देखील एकच आहेत. पूर्वी बाणेरची एक वाडी बालेवाडी होती. आधी झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये बाणेर, बालेवाडी ही गावे एकत्र होती. परंतु, यावेळी या प्रभाग रचनेमध्ये बाणेर व बालेवाडी ही गावे एकमेकांपासून तोडून प्रभाग क्रमांक 12 औंध-बालेवाडी व प्रभाग क्रमांक 13 बाणेर-सुस-म्हाळुंगे असा करण्यात आला आहे. या प्रभाग रचनेवर सुरुवातीपासूनच परिसरातील नागरिकांनी विविध प्रकारचे आक्षेप घेतले होते. परंतु, प्रभाग रचना जाहीर होऊन प्रभाग 12 व प्रभाग 13 मध्ये किरकोळ स्वरूपाचे बदल करून हे प्रभाग पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.