पुणे – इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा सराव करण्यासाठी पुढील आठवड्यापासून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.
इयत्ता दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागेल, अशी शक्यता गृहीत धरुन अकरावी प्रवेशासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार 17 मेपासून प्रवेश अर्जाचा भाग-1 भरता येणार होता. मात्र दहावीचा निकाल 20 जूनच्या सुमारास लागणार असल्याने आता अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. अकरावी प्रवेशासाठी शाळा व मार्गदर्शन केंद्रांसाठी मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला आहे. पालकांना युट्युब व फेसबुकद्वारे ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेश अर्ज भरण्याचा सराव विद्यार्थ्यांना करता यावा, यासाठी 23 मे पासून सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रवेशासाठीचे कॉलसेंटरही सुरू होणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थी, पालकांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्जाचा पहिला भाग तर 20 जूननंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.