न्यूयॉर्क : अमेरिकेत रोज दिवसेंदिवस गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता कॅलिफेर्नियामधील एका चर्चमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने चर्चमध्ये केलेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. आरोपीकडून हत्यार जप्त करण्यात आले आहे.
स्थानिक पोलिसांनी या घटनेविषयी माहिती दिली आहे. ऑरेंज काउंटी शेरीफ विभागाने सांगितले की, “लगुना वुड्स शहरातील जिनिव्हा प्रेस्बिटेरियन चर्चमधून गोळ्या झाडण्याचा आवाज ऐकू आला. ही घटना दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली.
गोळीबाराचा आवाजामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून हत्यार बंदुक जप्त करण्यात आली आहे. ऑरेंज काउंटी शेरीफ विभागाच्या प्रवक्त्याने माहिती देत सांगितले की, गोळीबार झाला तेव्हा चर्चमध्ये 30 जण उपस्थित होते. चर्चमधील उपस्थितांपैकी बहुतेक लोक मूळचे तैवानचे होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने द्वेषातून ही घटना घडवून आणल्याचा पोलिसांचा संशय आहे.