संयुक्त राष्ट्र – संयुक्त राष्ट्राने गेल्या दोन वर्षातील दुष्काळ सदृश स्थितीमुळे पाकिस्तानचा समावेश दुष्काळी देशाच्या यादीमध्ये केला आहे. पाकिस्तानसह 23 देशांचा समावेश या दुष्काळी देशांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या 17 जून रोजीच्या वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिनाच्या निमित्ताने वाळवंटीकरण विरोधी अधिवेशनाचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये या देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या शतकात दुष्काळामुळे मानवावर सर्वाधिक परिणाम आशिया खंडात झाला आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालात पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तान, अंगोला, ब्राझील, बुर्किना फासो, चिली, इथिओपिया, इराण, इराक, कझाकिस्तान, केनिया, लेसोथो, माली, मॉरिटानिया, मादागास्कर, मलावी, मोझांबिक, नायजर, सोमालिया, दक्षिण सुदान, सीरिया, अमेरिका आणि झांबिया या इतर 22 देशांचा समावेश आहे.
2050 पर्यंत 4 दशलक्ष चौरस किलोमीटरच्या प्रदेशाला उजाड होण्यापासून वाचवण्याच्या उपाय योजना करण्याची गरज असेल, असेही या अहवालात म्हटले आहे. हा भूभाग भारत आणि पाकिस्तानच्या भूभागाइतका व्यापक असणार आहे.
पृथ्वीवरील 40 टक्के इतका भूभाग नापिक बनला आहे. त्याचे दुष्परिणाम निम्म्या मानवजातीला भोगायला लागणार आहेत. या नापिकतेमुळे जगाच्या 50 टक्के उत्पन्नाइतका म्हणजे 44 लाख कोटी डॉलर इतके नुकसान संभवते, असेही या अहवालात म्हटले आहे.
सध्या जगभरातील 1 अब्ज हेक्टर जमिनीला 2030 पर्यंत लागवडीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी 1.6 लाख कोटी डॉलरची गरज आहे. सध्या जीवाश्म इंधन आणि कृषी अनुदानासाठी दरवर्षी केवळ 700 अब्ज डॉलरचे अनुदान दिले जाते आहे.