मुंबई :- आयपीएल 2022 मध्ये केकेआरसाठी शनिवारचा सामना ‘करो वा मरो’ स्वरूपाचा आहे. केकेआरची पुढील लढत सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध होणार आहे. नशिबाच्या जोरावर प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोलकाता संघाला या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.
संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याची अनुपस्थिती हा केकेआरसाठी मोठा धक्का आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी कमिन्स आयपीएल संपण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला परतणार आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका विरूद्धच्या सीरिजपूर्वी फिट होण्यासाठी कमिन्स मायदेशी रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तो बरा होण्यासाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात तो स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाला जून आणि जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधारही आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी तो ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नसल्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. मात्र, तो एकदिवसीय आणि कसोटीत संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे.
पॅट कमिन्सची कोलकातासाठीची यंदाच्या मोसमातील कामगिरी काही खास नव्हती. त्याने फलंदाजीच्या जोरावर एक सामना नक्कीच जिंकला होता, पण गोलंदाजीच्या जोरावर त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. आता पाठीच्या दुखापतीमुळे तो निर्णायक वेळी उर्वरित स्पर्धेतूनच बाहेर पडला आहे.
“पॅट कमिन्सला कोलकाता संघाने मेगा लिलावात 7.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते. कमिन्सने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धडाकेबाज अर्धशतक ठोकले, पण गोलंदाजीत तो काही कमाल करू शकला नव्हता. त्यानंतर त्याला काही सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले. संघात पुनरागमन करताना त्याने मुंबईविरूध्द अर्धशतकी खेळी करताना गोलंदाजीतही 2 विकेट्स घेत कोलकाताच्या विजयात महत्वाचे योगदान दिले होते. या मोसमात त्याने पाच सामन्यांत 262.50 च्या स्ट्राईक रेटने 63 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याने 19.5 षटकात सात विकेट्स घेतल्या आहेत.”
दरम्यान, केकेआरनं आत्तापर्यंत 12 सामन्यांत 5 सामने जिंकले असून 10 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये त्यांची टीम सातव्या क्रमांकावर आहे. कोलतातानं यापूर्वीच्या सामन्यांत मुंबई इंडियन्स विरूद्ध मोठा विजय मिळवून ‘प्ले ऑफ’ साठी आव्हान कायम ठेवलं आहे.