मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्री चालूच आहे. त्यामुळे निर्देशांकावर दबाव येत आहे. अशा परिस्थितीमध्ये सलग चौथ्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 276 अंकांनी म्हणजे 0.51 टक्क्यानी कमी होऊन 54,088 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 72 अंकाने कमी होऊन 16,167 अंकांवर बंद झाला.
अमेरिकेने अगोदरच व्याजदरात पाऊण टक्के वाढ केली आहे. आता लवकरच तेथील महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्या आधारावर अमेरिका व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण होते.
काल परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 3,960 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. अजूनही भारतीय शेअर बाजारात या गुंतवणूकदारांची साधारणपणे 19 टक्के गुंतवणूक आहे. पुढील एक वर्ष हे गुंतवणूकदार भारतामध्ये किती गुंतवून ठेवतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
लार्सन अँड टुब्रो, बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, पॉवर ग्रीड, इन्फोसिस, मारुती या कंपन्यांच्या शेअरच्या भावात आज घट झाली. ऍक्सिस बॅंक, इंडसइंड बॅंक, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बॅंक, एचडीएफसी बॅंक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. जिओची वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, एप्रिल महिन्याच्या महागाईची आकडेवारी अमेरिकेमध्ये आज जाहीर होणार आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
मुख्य निर्देशांकाबरोबरच स्मॉल कॅप 2.23 टक्क्यांनी तर मिड कॅप 0.46 टक्क्यांनी कमी झाला. भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार या क्षेत्राचे निर्देशांक घसरले तर रिऍल्टी, बॅंकिंग व वित्तीय कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. युरोप आणि आशियाई शेअर बाजाराचे निर्देशांक आज वाढले होते. मात्र तरीही भारतीय शेअर बाजारात विक्रीचे वारे कायम होते.