ठरलं.. 17 मे रोजी जाहीर होणार अंतिम प्रभाग रचना
पुणे : पुण्यासह राज्यातील प्रमुख 14 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठीची अंतिम प्रभाग रचना येत्या 17 मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबतचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे, या निवडणूका आता कधीही झाल्या तरी इच्छूकांना मात्र, निवडणूकांसाठी नेमक्या कोणत्या प्रभागात तयारी करायची याचा मार्ग मोकळा होणार आहे. पुण्यात महापालिकेने तयार केलेल्या कच्च्या प्रभाग रचनेत प्रभाग रचनेत निवडणूक आयोगाने तब्बल 28 बदल सुचविले होते. त्यानंतर जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर सुमारे साडेतीन हजार हरकती आल्या होत्या. तर या हरकतींच्या सुनावणीसाठी यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम यांची समिती नेमली होती. या समितीने आपला अंतीम अहवाल महापालिकेच्या माध्यमातून शासनास 10 मार्च रोजी सादर केला होता. त्यावर, मंगळवारी निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली आहे. त्यानुसार, आयोगाने सुचविलेले बदल महापालिका उद्या ( बुधवारी) पूर्ण करणार असून लगेच गुरूवारी अंतिम प्रभाग रचना आयोगाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असून या बदलानुसार, येत्या 17 मे रोजी अंतीम प्रभाग रचना महापालिका तसेच पालिकेच्या संकेतस्थळावर बदलासह जाहीर केली जाणार आहे.
——————————-
असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम
– आयोगाच्या सुचनेनुसार 11 मे पर्यंत अंतिम प्रभाग तयार करने
– 12 मे रोजी अंतिम प्रभाग रचना राज्य निवड्णूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविणे
– 17 मे रोजी महापालिकेच्या संकेतस्थळ तसेच फलकावर प्रभाग रचना जाहीर करणे
—————————-
या महापालिकांची जाहीर होणार प्रभाग रचना
पुणे, पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, आमरावती, नागपूर, सोलपूर, नाशिक, , कल्याण- डोंबिवली, मुंबई, ठाणे, नवी मुंबई
————
अशी झाला पुण्याच्या प्रभाग रचनेचा प्रवास
– 28 जानेवारी प्रारूप प्रभाग रचनेस आयोगाची मान्यता
– 1 फेब्रुवारी प्रारूप प्रभाग रचना जाहीर
– 1 ते 14 फेब्रुवारी प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागविल्या
– 17 ते 26 फेब्रुवारी हरकती आणि सूचना सुनावणी
– 10 मार्च – सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांना सुनावणी अहवाल आयोगास सादर
– 10 मे – आयोगाकडून अहवालाबाबत महापालिकेस बदलांच्या सूचना