पुणे(प्रतिनिधी) – मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यासमोर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. त्यानंतर ॲड. सदावर्ते यांची पोलीस ठाण्यातून रवानगी करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिसांनी ॲड. सदावर्ते यांच्या आवाजाचा नमूना गुरुवारी रेकॉर्ड केला. त्यांच्यावर 2020 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी जबाब घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. त्यानंतर लगेचच सातारा पोलिसांनी एका गुन्ह्यात त्यांचा ताबा घेतल्यानंतर आता पुण्यात सदावर्तेंवर दाखल असलेला गुन्हा समोर आला.
दरम्यान, या गुन्ह्यात पहिला जबाब भारती विद्यापीठ पोलिसांनी बुधवारी नोंदवला. यानंतर गुरुवारी त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. सातारा व कोल्हापूर येथील छत्रपतींच्या वंशजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून ॲड. सदावर्ते यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे. सातारा आणि नाशिक येथे अशाप्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
“ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दीड वर्षांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये त्यांना न्यायालयाने जामीन दिला होता. परंतु, चौकशीसाठी ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे येणार असल्याने हे निषेध आंदोलन करण्यात आले.”
– सचिन आडेकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा (पुणे) वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर, राजेंद्र कुंजीर, अमर पवार, तुषार काकडे, प्रसाद कोंडे, करण जगताप, देवदास लोणकर, मल्लिनाथ गुरवे आदी सहभागी झाले होते. भारती विद्यापीठ पोलिसांनी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते व नंतर सोडून देण्यात आले.