कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या उत्तराधिकाऱ्यावरून पक्षात धुसफूस सुरू झाली आहे. तृणमूलच्या काही नेत्यांनी ममतांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे नाव पुढे करण्याचा प्रयत्न केला. त्यावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
तृणमूलमध्ये अभिषेक यांना मानणारे तरूण नेते विरूद्ध ज्येष्ठ नेते असे गट निर्माण झाल्याचे चित्र काही महिन्यांपूर्वी समोर आले. त्यामुळे अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी ममतांनी पक्षाचे नवे पदाधिकारी नेमले. मात्र, तृणमूलच्या दोन नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे त्या पक्षाच्या भावी नेतृत्वाचा मुद्दा पुन्हा समोर आला. तृणमूलचे प्रदेश प्रवक्ते कुणाल घोष यांनी काही वर्षांनंतर ममतांची जागा अभिषेक घेतील, असे भाकित केले.
माकपचे नेते ज्योती बसू यांच्या नावावर बंगालचे मुख्यमंत्रिपद सर्वांधिक काळासाठी (23 वर्षे) भुषवण्याचा विक्रम जमा आहे. ममता 2036 पर्यंत मुख्यमंत्रिपदी राहून तो विक्रम मोडतील. त्यानंतर ममता अभिषेक यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सुत्रे सोपवतील, असे त्यांनी म्हटले. तर, ममता देशाच्या पंतप्रधान बनल्यानंतर अभिषेक यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पहायचे आहे, असे ट्विट तृणमूलच्या खासदार अपरूपा पोद्दार यांनी केले. नंतर ते ट्विट त्यांनी डीलिट केले.
मात्र, ममतांच्या उत्तराधिकाऱ्यासंदर्भात घोष आणि पोद्दार यांनी मांडलेली भूमिका तृणमूलच्या ज्येष्ठ नेत्यांना रूचली नाही. संबंधित भूमिकेला महत्व देण्याची गरज नाही. तशी भूमिका सर्वोच्च नेतृत्वाला मान्य नाही, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया काही ज्येष्ठ नेत्यांनी दिल्या. त्यातून अभिषेक यांचे नेतृत्व मान्य करण्याची त्यांची तयारी नसल्याचेच सूचित झाले.