पुणे : महापालिकेच्या रिक्त झालेल्या अतिरिक्त आयुक्तपदी मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजी अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक सेवा निवृत झाल्यानंतर या पदाचा पदभार कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, नगरविकास विभागाने कानडे यांच्या नियुक्तीचे आदेश काढत या चर्चांना पुर्ण विराम दिला आहे.
महापालिकेतील सेवा ज्येष्ठतेनुसार, पालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी हे पद असून राज्यशासनाने 2015 मध्ये या पदास मान्यता दिलेली होती. त्यानंतर 2016 मध्ये शासनास या नियुक्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, 2020 पर्यंत या पदावर कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये पहिल्यांदा या पदावर उपायुक्त सुरेश जगताप यांची नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये या पदावर नियुक्त करण्यात आले होते. तर मोळक यांची नियुक्ती ऑगस्ट 2021 रोजी झाली होती.
त्यानंतर 30 एप्रील रोजी मोळक सेवा निवृत्त झाल्याने शासनाने रिक्त झालेल्या या पदावर कानडे यांची नियुक्ती केली असून सप्टेंबर 2022 अखेर कानडे सेवा निवृत्त असल्याने पाच महिन्यांसाठी त्यांची ही नियुक्ती असणार आहे. कानडे यांच्याकडे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचा पदभार होता.
शांत, संयमी आणि मितभाषी अधिकारी ते महापालिकेत परिचित असून त्यांच्या कारकिर्दीत महापालिकेच्या मिळकतकर विभागाने महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक मिळकतकर वसूलीचा विक्रम केलेला आहे. विशेष म्हणजे करोना संकटात सर्वाधिक मिळकतकर वसूली करणारी पुणे ही राज्यातील पहिल्या क्रमांकाची महापालिका ठरली होती.