पटणा – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर उर्फ पीके हे सक्रिय राजकारणात उतरणार आहेत. त्याचवेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पीकेच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या संदर्भात मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विचारले असता त्यांनी या सगळ्यांशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. इतकंच नाही तर प्रशांत किशोर यांनी राजकीय पक्ष काढल्याच्या प्रश्नालाही नितीश कुमार यांनी उत्तर देण्यास नकार दिला.
विशेष म्हणजे नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यातील संबंध बिहारमध्ये नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. नितीश कुमार यांच्या जेडीयूने पीके यांना राजकीय व्यासपीठही दिले होते. त्यानंतर जेडीयूचे पुढचे नेतृत्व म्हणून पीके यांच्याकडे पाहिले जाऊ लागले मात्र 15 महिन्यातच नितीश कुमार यांनी पीकेला पक्षातून काढून टाकले.
दरम्यान, प्रशांत किशोर यांनी गेल्या महिन्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत अनेकदा बैठका घेतल्या होत्या. काँग्रेसला पुन्हा जोमाने उभे करण्यासाठी योजनाही त्यांनी सांगितल्या होत्या. त्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा होती, मात्र काही मुद्द्यांवर एकमत न झाल्याने त्यांनी पक्षात येण्यास नकार दिला होता.