मनिला- दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूला आशिया करंडक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला जपानच्या अकाने यामागुचीने तीन गेममध्ये पराभूत केले. 26 वर्षीय खेळाडूने सामन्याची सुरुवात सकारात्मक पद्धतीने केली; परंतु तिला ही लय कायम राखत विजय मिळविता आला नाही. या लढतीत अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या यामागुचीकडून 21-13, 19-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला.
हा सामना एक तास सहा मिनिटांपर्यंत रंगला. या स्पर्धेतील सिंधूचे हे दुसरे पदक ठरले. यापूर्वी तिने 2014 मध्येही कांस्यपदक जिंकले होते.पी. व्ही. सिंधूने सामन्याची सुरुवात धडाक्यात करत पहिला सेट 16 मिनिटांमध्ये 21-13 अशा मोठ्या फरकाने जिंकला. या गेमनंतर सिंधू सहज सामना जिंकल असे वाटत असताना दुसऱ्या गेममध्ये दोन पॉईंट्समध्ये जास्त वेळ घेत असल्याने तिच्यावर पॉईंट बहाल करण्याची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यावेळी तिचा पंचांसोबत वाद झाला. या लक्ष विचलीत घटनेनंतर सिंधू पिचाछीवर पडली. यामागुचीने दुसरा गेम 19-21 असा जिंकत बरोबरी साधली. यानंतर निर्णायक आणि तिसरा गेमही जिंकत यामागुचीने विजयावर शिक्कामोर्तब केला.
दरम्यान, सिंधूच्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.