कोथरूड – चांदणी चौकात बहुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली आहे. मात्र, रस्ते अरुंद आणि वाहतूक वळविल्यामुळे या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत असून ही कोंडी सोडविण्यासाठी या परिसरातील सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) तात्काळ तयार करण्यात यावेत, अशी मागणी होत होती. त्यानुसार बावधन, मुळशीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातून कोंडी काहीशी फुटली असून कामाला गती मिळाली आहे.
चांदणी चौकातील रस्त्याचे रुंदीकरण सध्या वेगाने सुरू आहे. यामध्ये बावधन, भूगाव, कोथरूड, एनडीए रोड यासह मुख्य महामार्गावरील वाहतुकीसाठी मोठे रस्ते बांधण्यात येत आहेत. पर्यायी रस्ते तयार करून ही कामे जलदगतीने सुरू आहेत. मात्र, काही ठिकाणी वाहतूक वळविल्यामुळे आणि पर्यायी रस्ते अरुंद असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत होती, त्यामुळे पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. त्यानुसार बावधन, मुळशीकडे जाण्यासाठी एक रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या ठिकाणी वाहतूक कोंडी काहीशी कमी झाली असली तरी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक चौकामध्ये वाहतूक रक्षकांची नेमणूक करण्यात यावी, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील सेवा रस्ते, पथदिवे, अंडरपास ही कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशीही मागणी होत आहे.