पुणे- महापालिका हद्द आणि खास करून नवीन समाविष्ट 34 गावांतील अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाकडून जोरदार हातोडा चालविण्याची तयारी आहे. या कारवाईचा मोठा फटका नवीन समाविष्ट गावांना बसू शकतो. यामुळे संबंधित मिळकतधारकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे “साकडे’ घालण्यास सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावांत अशी कारवाई रोखून नागरिकांना “खूष’ ठेवण्यासाठी माजी नगरसेवकांसह गावांतील इच्छुकांकडूनही आटापिटा सुरू आहे. यासाठी पालिका प्रशासकांच्या भेटीगाठी घेण्यासह मुुंबई”वरून’ सेटिंग लावण्याचाही प्रयत्न होत आहे. त्यामुळे समाविष्ट गावांतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना प्रशासकांना राजकीय दबावासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधाला सामोरे जावे लागू शकते.
प्रशासकांची जोरदार तयारी…
महापालिका प्रशासनाकडून शहरात अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत असताना यासाठी सात बांधकाम झोन तयार करण्यात आले. काही काळासाठी ही कारवाई थंडावली होती. मात्र, पालिकेवर प्रशासकांची नेमणूक होताच या कारवाईने जोर पकडला आहे. समाविष्ट गावात कारवाईसाठीही महापालिका प्रशासकांनी जोरदार तयारी केली आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याचे कामही झाले आहे. महापालिका हद्द आणि नवीन समाविष्ट झालेल्या 34 गावांत ही कारवाई होईल. या गावांमध्ये बऱ्याच प्रमाणात बेकादेशीर बांधकामे करण्यात आलेली आहेत. कारण त्यावर कुणाचे नियंत्रण नव्हते. आता महापालिका हद्दीत ही गावे आल्याने प्रशासकांनी त्यावर “नियंत्रण’ ठेवण्याची तयारी केली आहे.
ठेकेदारांना विभागून काम…
पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील बहुमजली अनधिकृत इमारतींची बांधकामे (हायरीच जॉ-क्रशर, माऊटेड एसकॅव्हेटर) मशिनरीच्या सहाय्याने पाडणे. (बांधकाम विकास विभाग झोन क्र. 1 ते 7) यासाठी ठेकेदारांकडून निविदा आल्या होत्या, याबाबतची प्रक्रिया स्थायी समिती असतानाच पूर्ण झाली असून आहे. त्यानुसार कारवाई करताना ठेकेदारांना विभागून काम देण्यात येणार असून एकाच वेळी सर्वत्र कारवाईची योजना असल्याचे सांगितले जात आहे.