सांगली – सांगलीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगली शहर पोलीस दलातील पोलीस ठाण्याच्या छतावर एका तरूणाने विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपुर्वी तरुणाने सुसाईड लिहिली आहे यामध्ये एका महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून या तरूणाने हे टोकाचे पाऊन उचलले आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अतुल गरजे-पाटील असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव असून अतुल हा 2015 पासून सांगली शहर पोलीस ठाण्यात साफसफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. नेहमी प्रमाणे तो सकाळी पोलीस ठाण्यात कामासाठी आला. साफसफाईचे काम आटोपून तो तेथून निघून गेला. दरम्यान त्याने पोलीस ठाण्याच्या छतावर जाऊन द्राक्षांवर फवारण्यात येणारे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही बाब पोलीस हवालदार होळकर यांच्या निदर्शनास आली. कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
दरम्यान, पोलीसांना अतुलने लिहिलेली सुसाईड नोट मिळाली असून त्यामध्ये सावकार महिलेच्या वसूलीच्या तगद्याला व त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्याने नोटमध्ये नमूद केले आहे. या नोटमध्ये त्याने सावकार महिलेल्या नावाचाही उल्लेख केला आहे. पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत.