पिंपरी – चिखली येथे आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने खुनाचे गूढ उकलले असून लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हा खून झाल्याचे उघडकीस आले. आरोपीने दिलेली माहिती पोलीस पडताळून पाहत आहेत.
लक्ष्मण देवासी (वय 8, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
देवासी याच्या घराजवळ राहणाऱ्या आणि चार दिवसांपूर्वी परिसर सोडून गेलेल्या एकाने देवासी याला पडक्या जागेत नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने त्यास विरोध केला. लक्ष्मण हा घरी जाऊन सांगेल व आपल्यावर गुन्हा दाखल होईल, या भितीतून त्या आरोपीने लक्ष्मण याचा दगडाने ठेचून खून केला. रविवारी दुपारी देवासी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आई-वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात दिली. रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास लक्ष्मण याचा खून झाल्याचे उघडकीस आले.
पिंपरी-चिंचवड : चिखलीत आठ वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून
लक्ष्मण याच्या खुनाची माहिती मिळताच समाजबांधव नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. सोमवारी देखील आंदोलन सुरूच ठेवले. जोपर्यंत आरोपीला शोधून अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. सोमवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात न घेता चिखली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या माडंला.
चिखली पोलिसांचे तपासात काय चुकले
दरम्यान आरोपी हा काही दिवसांपूर्वीच हा परिसर सोडून गेला होता. तो पुन्हा परिसरात कशासाठी आला, असा संशय पोलिसांना आल्याने गुंडा विरोधी पथकाने त्याच्यावरच लक्ष केंद्रीत केले होते. तसेच चिखली पोलीस दुपारी बारा वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासत होते. मात्र आरोपीने साडेअकरा वाजण्यापूर्वीच लक्ष्मणचा खून केला होता. त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमधील हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने खुनाची कबुली दिली.
दरम्यान, चिखली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते. चौकशी केल्यानंतरही काहीच माहिती मिळत नव्हती. दरम्यान संशयितांची चौकशी करण्यासाठी गुंडा विरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान एका आरोपीने खूनाची कबुली दिली. आरोपींनी दिलेली माहिती पडताळून पाहण्याचे काम पोलीस करीत आहेत.