नवी दिल्ली – निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना कॉंग्रेस मध्ये सामिल करून घेतले पाहिजे असे मत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सुमारे दोन महिन्यांपूर्वीही प्रशांत किशोर यांना पक्षात सहभागी करून घेण्यास खूप उत्सुक होत्या, परंतु त्यावर निर्णय घेण्यास विलंब झाला आहे आणि आता त्यांना पुन्हा पक्षात घेण्यास विलंब होऊ नये अशी अपेक्षाही मोईली यांनी वर्तवली आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मोईली यांनी म्हटले आहे की मी 2023 च्या आगामी विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाला तयार करण्यासाठी रणनीती तयार करण्यास उत्सुक होतो. त्यावेळी सोनिया गांधी या प्रशांत किशोर यांना या कामासाठी सामील करण्यास खूप उत्सुक होत्या. परंतु काही कारणांमुळे हे प्रकरण पुन्हा लांबणीवर पडले, असे मोईली यांनी सांगितले.
मोईली म्हणाले की त्यांनी 25 मार्च रोजी किशोर यांची भेट घेतली होती आणि विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यासाठी त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती. आपण स्वत: सोनिया गांधी यांच्याकडे प्रशांत किशोर यांना कॉंग्रेस मध्ये प्रवेश देण्याची शिफारस केली आहे असेही मोईली यांनी म्हटले आहे. त्यांच्या प्रवेशाला विरोध करणारे पक्षाच्या सुधारणेलाच विरोध करीत आहेत अशी टिप्पणीही त्यांनी केली.