पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेला येत्या 1 मे 2022 रोजी 60 वर्षे पूर्ण होत असून, या हीरकमहोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेचा इतिहास एका पुस्तकातून उलगडणार आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागामार्फत राबवलेली आणि राज्याने स्वीकारलेली नावीन्यपूर्ण योजना, यशोगाथा तसेच ग्रामीण जीवनशैलीत झालेला बदल या माहितीसह जुने फोटो तत्काळ द्यावे, असा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनचा इतिहास पुस्तकाच्या रूपात एकत्रित केला जाणार आहे. त्यासाठी संपादकमंडळ गठीत केले आहे. संपादक मंडळामध्ये ग्रामपंचायत प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राहुल काळभोर, जिल्हा परिषद सदस्य शरद लोंढे, पांडुरंग पवार, शरद बुट्टे पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, डायटच्या प्राचार्या शोभा खंदारे यांच्यासह अन्य सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पुस्तक छपाईकामी विभागनिहाय खालील माहिती ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, मांजरी फार्म यांनी उपलब्ध करून द्यावे. त्यामध्ये 20 एप्रिलपर्यंत ही सर्व माहिती gtempune@gmail.com या ई-मेलवर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.