नीलकंठ मोहिते
इंदापूर – बारामती लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्याच्या हालचाली भाजपने अतिशय मनावर घेतल्या असून यामध्ये इंदापूर तालुका चमत्कार घडवेल, अशी अपेक्षा भाजपला वाटू लागली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना अधिकचे बळ देण्यासाठी येणाऱ्या काही दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री जाहीर सभेसाठी निश्चित मानली जात आहे.
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला अधिकचे बळ देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मागील आठवड्यात शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती लावत राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद मजबूत करण्याची भूमिका घेतली. पवार यांच्या दौऱ्यास तोडीस तोड देण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या दोन सहकारी साखर
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 12 ते 14 ठिकाणी जाहीर सभा आयोजित करून सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. हर्षवर्धन पाटील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात सातत्याने आहेत. या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा इंदापूर तालुक्यात जाहीर सभेसाठी येऊन बळकटी देतील अशी अपेक्षा भाजप कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
हर्षवर्धन पाटील जाहीर सभेमध्ये म्हणतात आम्ही थेट दिल्ली सुपर एक्सप्रेसने जातो. गृहमंत्री अमित शहा आपल्या पक्षाचे आहेत. पाटील यांचे जुने सहकारी काही प्रमाणात, त्यांना राजकीय सोडचिठ्ठी देत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हाती बांधत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कळपात सामील झाले आहेत. याची सल व चीड हर्षवर्धन पाटील यांना मोठ्या प्रमाणात आलेली दिसते आहे.
त्यामुळे आपल्या अधिपत्याखाली चालणाऱ्या नीरा-भीमा व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गावागावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा व भाजपमधून राष्ट्रवादीत जाणाऱ्यांचा खरपूस घेत आहेत.
हर्षवर्धन पाटील यांचे बंधू बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करणाऱ्यांना राजकीय नितीमत्ता, वास्तविकता, उगम स्थान यासंदर्भात न चिडता, ज्ञानाचे डोस पाजले आहेत. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आगपाखड केली. हाच व्हिडिओ तालुक्यातील घराघरापर्यंत पोहोचल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना भाजपमधून सपोर्ट निर्माण झाला. तर लाखेवाडी गावातील सभेला तसेच संवाद दौऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.