मुंबई – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या तिढा अद्यापही सुटला नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी संप सुरु आहे. मात्र अद्यापही ही मागणी मान्य झाली नसून या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. दरम्यान आंदोलनातील एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्याच्या मृत्यूमूळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महेश लोले असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते कोल्हापूर कागल आगारातील कर्मचारी आहेत. शहरातील सायन हॉस्पिटलमध्ये या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानाबाहेर गोंधळ घातल्यामुळे आंदोलनाला गालबोट लागले आहे. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आझाद मैदानावरून काढले त्यावेळी या जमावाने थेट सीएसएमटी स्थानकामध्ये ठिय्या मांडला आहे. अशातच एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईमुळे लोले यांचा बीपी वाढला होता, या अस्वस्थेतूनच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप इतर कर्मचाऱ्यांनी केला आहे. काल राष्ट्रवादीचे जेष्ट नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही आक्रमक झालेल्या आंदोलकांनी उग्र आंदोलन केले होते. त्यानंतर एसटी आंदोलनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आता दिसून येत आहे.