मुंबई – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखीच चिघडल्याचे चित्र आहे. काल राष्ट्रवादीचे जेष्ट नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही आक्रमक झालेल्या आंदोलकांनी उग्र आंदोलन केले. यावेळी पवार यांच्या निवास्थानावर दगड व चपला देखील फेकल्याचे दिसून आले. मध्यरात्रीपर्यंत हा गोंधळ सुरुच राहीला यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आझाद मैदानावरून काढले त्यावेळी या जमावाने थेट सीएसएमटी स्थानकामध्ये ठिय्या मांडला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने 22 तारखेपर्यंत सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिल्यानंतर देखील एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखीच वाढले आहे. पवारांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी जमावाला भडकावल्याप्रकरणी आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखाल करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आंदोलकांना शांतता राखून सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे. पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्यानंतर सर्व एसटी कर्मचारी पुन्हा आझाद मैदानावर पोहोचले होते. रात्रीपर्यंत आंदोलक तिथेच थांबल्यानंतर या आंदोलकांना मध्यरात्री उशीरा आझाद मैदानातून देखील हटवण्यात आले आहे. या कारवाईनंतर हे सर्व आंदोलक जवळच्याच सीएसएमटी स्थानकात ठिय्या मांडून बसले आहेत. आपल्याला पोलिसांनी बळजबरीने आझाद मैदानातून हुसकावल्याचा दावा या आंदोलकांनी केला आहे. यावेळी आंदोलकांनी पोलीस कारवाई दरम्यान आमची माणसे गायब झाल्याचा देखील खबळजनक दावा केला आहे.