पुणे – करोनामुळे मागील दोन वर्षांत शालेय शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्याच झालेल्या नाहीत. यामुळे आताच्या बदली हंगामात त्या निश्चितच होणार आहेत. यादृष्टीने शिक्षण विभागाने बदलीपात्र अधिकाऱ्यांकडून पसंती मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने 9 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयाद्वारे गट “ब’चे अधिकारी तसेच गट “क’, “ड’ मधील कर्मचारी यांना समुपदेशनाद्वारे बदलीचे धोरण लागू केले आहे. त्यानुसार रिक्त पदांची यादी व बदली पात्र अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. प्रामुख्याने उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक, अधिव्याख्याता यांच्या बदल्या होणार आहेत. बदलीपात्र अधिकाऱ्यांनी पसंतीक्रमाची माहिती शिक्षण आयुक्तालयात येत्या 8 एप्रिलपर्यंत सादर करावी लागणार आहे. शिक्षण आयुक्तालयाने पसंतीक्रमासह एकत्रित माहिती 13 एप्रिलला शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. गट “ब’मधील ज्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी विनंती अर्ज सादर केले आहेत. ते अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. मुदतीत पसंतीक्रमाची माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशासनाच्या रिक्त पद भरण्याच्या निकडीनुसार पदस्थापना दिली जाणार आहे. हे संबंधित अधिकारी पदस्थापनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत मुदतपूर्व बदलीसाठी अर्ज करू शकणार नाहीत. अशा अधिकाऱ्यांनी विनंती अर्ज सादर केल्यास ते विचारातही घेतले जाणार नाहीत.