पुणे –महापालिकेच्या नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अंतीमत: मंजुरी मिळाली असून, आता येथे प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
महापालिकेच्या नियोजित भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागचे शुक्लकाष्ठ संपले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या महाविद्यालयाची मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ही संकल्पना पहिल्यांदा मांडली. तसेच, त्यासाठी प्राथमिक तरतूदही केली. त्यानंतर मुरलीधर मोहोळ हे स्थायी समिती अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी हा प्रकल्प पुढे नेला. लॉकडाऊनच्या काळात हा विषय मागे पडला. मात्र, महापौर असताना मुरलीधर मोहोळ आणि महापालिका प्रशासनाने त्याला गती दिली. त्यांनी दिल्लीपर्यंत म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला.
मात्र, कधी वर्गखोल्या नियमात न बसणाऱ्या, कधी अन्य सुविधा नाहीत, प्राध्यापक भरती पुरेशी नाही अशी अनेक कारणे देत या रुग्णालयाची परवानगी डिसेंबर महिन्यात “नॅशनल मेडिकल कमिशन’ने नाकारली. त्यानंतर महापालिकेने या निर्णयावर दोनदा अपीलही केले मात्र परवानगी नाकारली. अखेर पुन्हा परवानगीची प्रक्रिया केल्यानंतर मार्चच्या सुरुवातीला महापालिकेला अखेर अंतीमत: नॅशनल मेडिकल कमिशनने परवानगी दिली. मात्र, सुरुवातीला 100 च विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंबंधी मंजुरी मिळाली. दोन दिवसांपूर्वी “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा’च्या प्रतिनिधींनी पुन्हा नियोजित महाविद्यालयाच्या व्यवस्थांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाला त्यांचा अहवाल दिला आहे.
नियोजित महाविद्यालयाच्या सर्व मान्यता आता झाल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. केंद्रीय पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया होते. त्यामुळे महाविद्यालयांच्या यादीमध्ये आपल्या या महाविद्यालयाचे नाव समाविष्ट केले जाईल, त्यानंतर विद्यार्थ्यांना हा पर्याय ओपन होणार आहे. सध्या वैद्यकीय विभागाच्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरू आहे. तिसरी अंतीम फेरी अद्याप होणार आहे. त्या फेरीमध्ये या 100 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल.
– डॉ. अंजली साबणे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, मनपा