पुणे –विद्यमान सभागृहाची मुदत संपल्याने आयुक्त विक्रम कुमार हे महापालिकेचे प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत. या कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांना आपल्या नागरी सुविधा तसेच अन्य तक्रारीं सोडवण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकारी तसेच विभाग प्रमुखांकडे असणार आहे.
आता सभागृहाची मुदत संपल्याने नगरसेवकांचे पद विसर्जित झाले असून नागरिकांना आपल्या तक्रारी त्यांच्याकडे करता येणार नाहीत. तर, महापालिकेच्या कारभाराची जबाबदारी प्रशासक म्हणून आयुक्तांकडे असणार आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या निवारण करण्याची जबाबदारीही प्रशासनाकडे असणार आहे. त्यामुळे, आयुक्तांकडून प्रशासकीय कारभाराचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांना आदेश
या आदेशानुसार सर्व खातेप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, उपायुक्त परिमंडळ 1 ते 5 यांनी सोमवार व गुरुवार सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत आपल्या कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी तसेच समस्या सोडवायच्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी सर्व सहायक आयुक्तांनी दररोज सकाळी 10. ते दुपारी 12. 00 या वेळेत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करायचे आहे.
दरम्यान, आता प्रशासनाकडे कारभार आल्याने कामकाज वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान आयुक्तांपुढे आहे.
वाहने जमा; कार्यालयेही रिकामी होणार
अनेक पदाधिकाऱ्यांनी मुदत संपल्याने आपली वाहने सायंकाळी 5 वाजेनंतरच प्रशासनाकडे जमा केली आहेत. तर, काही पदाधिकारी रात्री 12 वाजेपूर्वी वाहने जमा करणार होते. याशिवाय प्रशासनाने सर्व पदाधिकारी तसेच राजकीय पक्षांना कार्यालये रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार अनेक पक्षांकडून साहित्य इतरत्र नेण्यास सुरुवातही करण्यात आली होती.
निवडणुकांमुळे पहिल्यांदाच प्रशासक
यापूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे महापालिकेत तत्कालिन आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, निवडणुका लांबल्याने इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक म्हणून नेमले जाणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच पुणेकरांचा कारभार प्रशासकाच्या हातात असणार आहे.
प्रशासकीय कामकाजाबाबत राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचना अज्ञाप आलेल्या नाहीत. दरम्यान नागरिकांना समस्या सोडवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय तसेच विभाग प्रमुखांना वार आणि वेळा निश्चित करून देण्यात आले आहेत. शासनाच्या सूचना आल्यानंतर हे कामकाज आणखी सुलभ व सोपे होईल. – विक्रम कुमार, आयुक्त, प्रशासक मनपा.