चंदीगड – पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.या निवडणुकीत जीवनज्योत कौर यांनी अमृतसर पूर्व मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिया यांचा पराभव केला आहे.
या पराभवानंतर पंजाबमधील काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत कलह सुरू झाल्याचं दिसून येतंय. यातच पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. तर दुसरीकडे सिद्धूही आपल्या भूमिकांवर कायम आहेत. सिद्धूंनी यादरम्यान, चरणजीत सिंग चन्नी यांच्यावरही निशाणा साधला. तसंच कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावरही निशाणा साधत त्यांना डाकू, लालची आणि ढोंग करत असल्याचं म्हटलं.
नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले,’ज्यांनी माझा अपमान केला आहे. त्या सर्व मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या व्यक्ती आम्हाला पाण्यात पाहत होत्या, आज तेच पाण्यात पडले. तसेच पंजाबच्या जनतेनं नवा पर्याय शोधल्याबद्दल त्यांनी जनतेचं अभिनंदनही केलं. पंजाबमध्ये बदलाचं राजकारण होते आणि पंजाबच्या लोकांना मी शुभेच्छा देतो.’ असं म्हणत सिंधू यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे.