वाई – वाई नगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीत शुक्रवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी प्रशासकीय कार्यकारी समिती सदस्यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी तथा प्रशासक किरणकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली लेखापाल रोशन गायकवाड यांनी सादर केलेला 56 कोटींचा अर्थसंकल्प 33 लाख शिलकीसह मंजूर झाला.
कोणतीही करवाढ न करता शहरातील विविध भागात लावण्यात येणारे फ्लेक्स बोर्ड तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध जाहीरातींसाठी जाहिरात धोरण तयार करण्यात येणार असून नगरपालिकेच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे. तसेच पुढील आर्थिक वर्षापासून शहरात होणाऱ्या नवीन बांधकामांची दरवर्षी डिसेंबर महिन्यात पुरवणी पाहणी केली जाणार आहे.
याद्वारे नगरपालिकेच्या कर उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या मिळकतधारकांना घरपट्टीत सूट देण्याचा निर्णय जाहीर करून मुख्याधिकाऱ्यांनी वाईकरांना दिलासा दिला आहे.
सदर अर्थसंकल्प पर्यावरणाचे संवर्धन करणारा तसेच विकासकामांना प्राधान्य देणारा असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
सदर बैठकीस कार्यालय अधिक्षक नारायण गोसावी, बांधकाम अभियंता सचिन धेंडे, नगररचनाकार निनाद जगताप, करनिरीक्षक अभिजीत ढाणे, पाणीपुरवठा अभियंता क्रांती वाघमळे, आस्थापना प्रमुख दिपाली साबळे उपस्थित होते.
पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या मिळकतधारकांना घरपट्टीत सूट
शहरात आपल्या इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा व इतर अपारंपारिक उर्जेचा वापर करणारे, घरगुती कंपोस्ट खत बनवणारे मिळकतधारक तसेच घरगुती किंवा व्यावसायिक वापरामध्येही इलक्ट्रिक वाहनाचा वापर करणारे मिळकतधारक यांना घरपट्टीमध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला असून 1 एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
गुणात्मक विकासकामांना प्राधान्य
सदर बजेटमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना, कृष्णा नदी संवर्धन योजना, कृष्णा नदीवर नवीन पर्यायी पुल, भूमिगत गटर योजना, मध्यवर्ती दुमजली पार्किंग ही विकासकामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.