पुणे (उत्कर्ष खवले) –वानवडीमध्ये 2017ला या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दोन व भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवक निवडून आले. या प्रभागातील नगरसेवक प्रशांत जगताप यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शहराध्यक्ष पद दिले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद या प्रभागात असल्याने नवीन प्रभाग रचना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी अनुकूल ठरणार आहे. इतर पक्षांना मात्र मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे. नवीन प्रभाग रचनेमुळे सत्तेत कोण विराजमान होणार याची उत्सुकता असणार आहे. आताच्या महापालिका निवडणुकीसाठी विद्यमान नगरसेवकांसह इतर बहुसंख्य हौशी इच्छुकांनी तयारी केली आहे. प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसह खुल्या प्रवर्गात पुरूष की महिला, या पैकी आरक्षण काय पडेल यावर निश्चितपणे उमेदवारीचे चित्र बदलू शकते. त्यामुळे काही इच्छुकांनी शेजारच्या प्रभागातून वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.
प्रभागातील समाविष्ट भाग
वानवडी, कौसरबाग, एस.आर.पी.एफ-2, नेताजी नगर सोसायटी, गंगा सॅटेलाइट, गुलमोहर हॅबिटॅट सोसायटी, कुबेर गाडन, आंबा वाटिका, सर्वोदय, ब्रम्हा मॅजेस्टिक सोसायटी, कुबेर भटनागर कॉलनी, साळुंखे विहार, ऑक्सफोर्ड व्हीलेज, केदारी नगर, आझादनगर, विकासनगर.
विद्यमान नगरसेवक
गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेले विशेष काम
सोसायटींना मोठया पाण्याच्या लाइन टाकल्या त्यामुळे पाणी पुरवठा मुबलक होत आहे. वानवडी येथील गल्लीबोळातून कॉंक्रीटीकरण केले. एसआरपीएफ मध्ये सांडपाणी वाहिनी व रस्ते तयार केले. एमपीएससी मुलांसाठी मोफत अभ्यासिका सुरू केली.धनराज घोगरे (भाजप)
शिवरकर दवाखान्यामध्ये दहा बेडचे डायलेसीस सेंटर सुरू केले. आनंदवनला जाण्यासाठी आझादनगरकडून रस्ता सुरू करून प्रवेशद्वार केले. स्मशानभूमी नुतनीकरण केले. गंगा सेटेलाइट ते नेताजीनगर कित्येक वषे बंद असलेला पुल व रस्ता सुरू केला. कालिंदा पुंडे (भाजप)
वानवडी येथील जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. प्रभागातील मूलभूत सुविधा पुरविल्या आहेत. सर्व समस्या सोडविल्या आहेत. प्रभागात अधिकाधिक निधी आणून आजपर्यंत विकासकामांवर भर दिला आहे. रेंगळेली कामे आम्ही प्राधान्याने पूर्ण केली आहेत.रत्नप्रभा जगताप (राष्ट्रवादी)
एसआरपीएफ गट क्रमांक – 1 व गट क्र. 2 यामध्ये रस्ते कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण केले. बास्केट बॉल कोर्ट केले. वानवडी क्षेत्रीय कार्यालय वानवडी येथे आणले. शहीद अशोक कामठे उद्यान, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, विविध धर्माच्या स्मशानभूमी, दफनभूमी, पाण्याच्या टाक्यांची कामे केली.प्रशांत जगताप (राष्ट्रवादी)
गतपंचवार्षिकचे लढवय्ये जनसेवक
प्रभागातील कामांबाबत त्यांचे मत…
प्रभागात निवडून आलेल्या नगरसेवकांनी जी काही आश्वासने दिली त्यातील कोणतेही कामे योग्यरित्या पूर्ण झालेले नाही. आताही प्रभाग रचना पडल्यानंतर जुन्या कामांचा विसर त्यांना पडला असून फक्त निवडणुकीवरच लक्ष केंद्रीत केले आहे. विकास कुठलाच झालेला नाही. मकरंद केदारी (शिवसेना)
भारतीय जनता पक्षाच्या गतपंचवार्षिकच्या उमेदवार कालिंदा पुंडे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उतरलेल्या कांचन जाधव यांनी मोठे आव्हान निर्माण केले होते, या प्रभागातील नगरसेवकांच्या कामाबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याबाबत संपर्क होऊ शकला नाही,
या प्रभागात एकाच घरातील दोन नगरसेवक असतानाही त्या प्रमाणात विकासकामे झालेली नाहीत. आतापर्यंत फक्त सत्ता उपभोगली गेली आहे. जी काही कामे झाली ती भाजपची सत्ता पालिकेत असल्याकारणाने झालेली आहेत. याचे श्रेय फेक्त भाजप पक्षालाच जाते.कोमल शेंडकर (भाजप)
प्रभागात फक्त रंगरंगोटी केली. नवीन शाळा, उद्यान अशी एकही गोष्ट आणली नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून बायोगॅस प्रकल्प सुरू होऊन बंद झाले. वानवडी येथील महापालिका शाळा बंद पडली, या शाळेच बांधकाम पूर्ण करता आले नाही. अन्य विकासकामेही रेंगाळलेलीच आहेत. दिनेश होले (भाजप)
2022 निवडणुकीसाठी इच्छुक
राष्ट्रवादी : प्रशांत जगताप, मोहशीन शेख,नंदा लोणकर, प्रफुल्ल जांभूळकर. भाजप : धनराज घोगरे, लक्ष्मी घोगरे,दिनेश होले, कालिंदा पुंडे, महेश पुंडे. कॉंग्रेस : साहिल केदारी. शिवसेना : मकरंद केदारी,ओमकार जगताप. यांच्यासह या प्रभागातून ऐनवेळी अपेक्षांची संख्याही वाढू शकते.