वॉशिंग्टन – युक्रेनविरुद्ध पूर्वनियोजित आणि अनाकलनीय पद्धतीने युद्ध पुकारण्याच्या धाडसाची रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना किंमत चुकवावीच लागेल, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केले आहे. रशियन हुकूमशहाच्या या आक्रमकतेला साऱ्या जगाने एकजुटीने पायबंद घातला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बायडेन यांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज प्रथमच देशाला उद्देशनू भाषण केले त्यात त्यांनी हे प्रतिपादन केले.
आमच्या संपूर्ण इतिहासात आम्ही हा धडा शिकलो आहोत की, जेव्हा हुकूमशहा त्यांच्या आक्रमकतेची किंमत मोजत नाहीत, ते अधिक अराजकता निर्माण करतात. ते पुढे जात राहतात आणि अमेरिका व जगासाठी त्यांच्यापासून मोठा धोका निर्माण होतो. पण आता पुतीन यांच्यासारख्या हुकूमशहाला त्याची किंमत मोजावीच लागेल, असे ते म्हणाले. पुतीन यांचे युद्ध पूर्वनियोजित आणि बेफिकिरीचे होते. त्यांनी मुत्सद्देगिरीचे प्रयत्न नाकारले. त्यांना वाटले की, पश्चिमी देश आणि नाटो आपल्या या कृत्यावर काहीच प्रतिसाद देणार नाहीत, पण हा त्यांचा गैरसमज आहे. आम्ही त्यांच्या या कृतीला प्रतिसाद देत आहोत असे ते म्हणाले.
बायडेन म्हणाले की, पुतीन यांनी युक्रेनवरील हल्ल्याविषयी चुकीची संकल्पना करून घेतली. आता युक्रेनमधील जनता आणि सारे जग पुतीन यांच्या विरोधात उभे ठाकले आहे, असे ते म्हणाले.
बायडेन म्हणाले की अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणावर आणि काळजीपूर्वक तयारी केली आहे. पुतीनचा सामना करण्यासाठी आम्ही युरोप आणि अमेरिकेपासून आशिया आणि आफ्रिकेपर्यंत इतर स्वातंत्र्यप्रेमी राष्ट्रांची युती तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे ते म्हणाले. तथापि, अमेरिकचे सैन्य युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात लढण्यासाठी पाठवले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.