नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचे पुतणे मुबाशीर आझाद यांनी रविवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जम्मूमधील त्रिकुटा नगर येथील भाजपच्या मुख्यालयात झालेल्या समारंभात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कॉंग्रेसच्या विद्यमान नेत्यांकडून आपल्या काकांना जी अपमानास्पद वागणूक मिळत आहे, त्यावरून आपण अत्यंत व्यथित झालो असल्याचे मुबाशीर आझाद यांनी नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
गुलाम नबी आझाद हे कॉंग्रेसमधील सक्षम नेत्यांपैकी एक आहेत. मात्र कॉंग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा अनादर केला आहे, असेही मुबाशीर आझाद म्हणाले.
आझाद यांना पद्भुषण पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रयत्नांना ओळख प्राप्त करून दिली आहे. कॉंग्रेस पक्षामध्ये स्वार्थी चढाओढ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे देश आणि समाजाच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या पाठिशी उभे रहायचे आपण ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले.
गुलाम नबी आझाद यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये “जी-23′ गटाच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षातील सुधारणांची मागणी केली होती.