मुंबई – मनसेच्या नव्या शाखेच्या उदघाटनावेळी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असलेला स्टेज कोसळल्याची घटना मुंबईतील गोरेगाव येथे घडली आहे. सुदैवाने राज ठाकरे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. राज ठाकरे यांचे सुरक्षारक्षक, पोलीस आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ते थोडक्यात बचावले. तसंच कार्यकर्त्यांनाही कोणतीही दुखापत झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,’मुंबईतील चांदीवली आणि गोरेगाव येथे मनसेच्या नव्या पक्ष कार्यालयाचं उदघाटन आज राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. यादरम्यान, राज ठाकरे यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. तेथे उपस्थित गर्दीने राज यांच्या हस्ते उदघाटन झाल्यानंतर स्टेजवर तुफान गर्दी केली. स्टेजवर क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते आल्यानं स्टेजचा पुढील भाग कोसळला.
दरम्यान, ‘राज यांच्या सुरक्षारक्षक, पोलीस आणि कार्यकर्त्यांनी राज यांना सावरलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी माईक हातात घेत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आणि गोंधळून न जाण्याचं आवाहन केलं. राज ठाकरे सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नसल्याचं पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे.’