पिंपरी -शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शहरातील 170 शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यंदा 9 शाळा अल्पसंख्याक झाल्याने “आरटीई’मधून बाहेर पडल्या आहेत. तर, 3 शाळा बंद झाल्याने त्यांचेही नाव “आरटीई’च्या यादीतून कमी झाले आहे. 25 टक्के राखीव कोट्यानुसार एकूण 3 हजार 324 जागा निश्चित झाल्या आहेत.
“आरटीई’ अंतर्गत गेल्या वर्षी शहरातील 182 शाळा पात्र ठरल्या होत्या. तर, यंदा 170 शाळा त्यासाठी पात्र ठरल्या आहेत. पात्र 170 शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तर, 9 शाळांनी अल्पसंख्यांक दर्जा घेतल्याचे प्रमाणपत्र महापालिका शिक्षण विभागाला सादर केले आहे. त्यामुळे त्या शाळा आरटीई यादीतून बाहेर पडल्या आहेत. तर, तीन शाळा बंद पडल्या आहेत.
त्यामुळे या शाळा देखील आरटीईच्या यादीत यंदा नाहीत. गेल्या वर्षी आरटीई अंतर्गत 3 हजार 464 इतक्या जागा होत्या. तर, यंदा 3 हजार 324 जागा असणार आहेत. आरटीई अंतर्गत ऑनलाइन प्रवेशासाठी जिल्हा परिषदेकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची कार्यवाही सुरू होणार आहे. पिंपरी केद्रांतर्गत यंदा आरटीई प्रवेशासाठी 62 शाळा तर, आकुर्डी केंद्रातंर्गत 108 शाळा आहेत, अशी माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.