दोन महिन्यानंतर बदल्या करा
पुणे – महापालिकेच्या शाळांसह शहरातील खासगी शाळांची जबाबदारी असलेल्या पालिकेच्या शिक्षण विभागाच्या 10 सहायक प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदल्यांना दोन महिन्यांची स्थगिती देण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरूवारी मुख्यसभेत दिले. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी हे आदेश काढले होते. महापालिकेचे शैक्षणिक वर्ष संपण्यास शेवटचे दोन महिने शिल्लक असून त्यानंतरच या बदल्या करण्यात याव्यात, असे आदेश महापौरांनी दिले आहेत. मात्र, प्रशासन या निर्णयाची अंमलबजावणी करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिका शाळांचे नियोजन तसेच खासगी शाळांच्या शासकीय कामकाजासाठी महापालिकेकडून 12 सहायक प्रशासकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यातील 10 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे आताच कुठे शाळा सुरू झालेल्या असल्याने शाळांच्या कामकाजाची अडचण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी मुख्यसभेत केली.
यानंतर, या प्रशासकीय बदल्या असून त्या नियमित असल्याचा खुलासा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी केला. तर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी हा प्रस्ताव पुढे ढकलावा, अशी मागणी केली. त्यानंतर महापौरांनी या बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले.